राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 06:30 PM2020-09-06T18:30:04+5:302020-09-06T18:30:28+5:30
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले.
अकोला : शिक्षकांच्या मागण्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना केवळ आश्वासने देण्यात येत आहेत. विनावेतन काम करणाºया शिक्षकांच्या वेठविगारी व्यवस्थेला शासन जबाबदार आहे. शिक्षकांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ महासंघ व विज्युक्टाने केलेल्या आवाहनानुसार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मूल्यांकन पात्र घोषित व अघोषित तुकडीवरील शिक्षकांना वेतन अनुदान द्यावे. त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षक, शिक्षकेतरांना लागू करावी, राज्य कर्मचाºयांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी. यासह प्रमुख मागण्यांना घेऊन संघटना आंदोलनात उतरली आहे. शिक्षण आणि शिक्षकांप्रती शासनाच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध म्हणून शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, जिल्हाध्यक्ष डी.एस. राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम पालकर, सचिव पंकज वाकोडे, उपाध्यक्ष अविनाश काळे, राजेंद्र तराळे, संजय देशमुख गणेश वानखडे, प्रवीण ढोणे, संतोष अहिर, संजय गोळे, भास्कर काळे, संतोष गावंडे, जयदीप कुलकर्णी, प्रफुल देशमुख, संदीप बाहेकर, विठ्ठल पवार, मो. हरीस, रमेश भड, प्रशांत मलिये, अविनाश सानप, सदानंद बानेरकर, श्रीकांत मोहोळे, महल्ले सागर, कस्तुरे, दिलीप चव्हाण यांच्यासह तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.