टेली आयसीयू : औरंगाबाद, सोलापूर, जालन्यामध्ये सुरू; अकोला अजूनही वेटिंगवरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:13 AM2020-09-12T11:13:01+5:302020-09-12T11:13:26+5:30
अकोला वगळता इतर चारही जिल्ह्यांमध्य टेली आयसी यू कार्यान्वित झाले; मात्र अकोला अजूनही वेटिंगवरच आहे.
अकोला : कोरोनामुळे वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी टेली आयसीयू हे प्रभावी ठरेल, असा दावा आरोग्य मंत्र्यांनी केला होता. राज्यातील अकोला, जालना, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद येथे टेली आयसीयू ची यंत्रणा उभारण्याची घोषणाही जुलै महिन्याच्या अखेरीस केली होती. यापैकी अकोला वगळता इतर चारही जिल्ह्यांमध्य टेली आयसी यू कार्यान्वित झाले; मात्र अकोला अजूनही वेटिंगवरच आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूदरही वाढताच आहे. सप्टेंबर महिना हा कोरोना संक्रमणाचा उच्चांक गाठणारा महिना ठरणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसातच सर्वाधिक रुग्ण व दिवसाला सरासरी दोन मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. कोरोनामुळे जीव गमावावा लागलेल्या बहुतांश रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या रुग्णांना इतर आजारावरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासते; परंतु ऐन वेळी जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात टेली आयसीयू सुरू करण्यास मान्यता मिळाली होती.
जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होऊनही सर्वोपचार रुग्णालयात टेली आयसीयू सुरू झाले नाही. रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर रुग्ण असलेल्या कोविड वॉर्डात सीसी कॅमेरे लावण्यात आले. ब्रॉडबँड जोडणी नसल्याने टेली आयसीयू सुरू करण्यास अडचणी येत असल्याची माहिती, सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने दिली.
ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका
टेली आयसीयू सुरू झाल्यास मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुकास्तरावरील कोविड सेंटरवरील गंभीर रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. अकोल्यासह इतर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर येथील रुग्णांवर उपचारासंदर्भात डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतील, अशी व्यवस्था आहे.