रामदासपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा
अकोला : शहरातील एका व्यक्तीने व्यापारी व उद्योजकांना पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आणखी काही तक्रारकर्ते पोलिसांकडे तक्रार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
अकोल्यातील रहिवासी देवेंद्र गोपाल अग्रवाल याने पुण्यातील स्पार्क रियालिटी या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात असलेल्या सुमित नामक व्यक्तीच्या साहाय्याने अकोल्यातील अनेकांना पुणे येथे फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. दर महिन्याला एक किस्त भरून तीन वर्षांत तो फ्लॅट देण्याचेही आमिष या दोघांनी दाखविले. शहरातील डॉक्टर, वकील, अभियंते तसेच उच्च प्रतिष्ठित नागरिकांना त्याने पुण्यातील फ्लॅटची भुरळ पाडली. ज्या व्यक्तींनी तीन वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना फ्लॅटची गरज नसेल तर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष या दोघांनी अकोलेकरांना दाखविले. त्यामुळे या आमिषाला अनेक जण बळी पडले असून काहींनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची तक्रार डॉक्टर वाघेला पिता-पुत्रांनी केली असून यासह तब्बल दहा ते बारा जण तक्रार करण्याच्या मनस्थितीत आहेत. पुण्यातील फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविणाऱ्या या दोघांनी खडकी परिसरातही अनेकांना अशाच प्रकारे गंडविले याची माहिती समोर आली असून या ठिकाणीही फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना लाखो रुपयांनी चुना लावल्याची माहिती प्राप्त झाली आहे.