देशभरातील किन्नरांचे दहा दिवसीय राष्ट्रीय संमेलन अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:13 PM2018-01-31T14:13:21+5:302018-01-31T14:17:59+5:30
अकोला: देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत अकोल्यात होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे.
अकोला: देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत अकोल्यात होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे. संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून कलशयात्रा काढण्यात येणार आहे. दामले चौकातील अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये हे राष्ट्रीय संमेलन होणार आहे. या संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या संमेलनासाठी देशभरातील किन्नर अकोल्यात येणार आहेत. देशात किन्नरांची संख्या ६ लाखांच्या जवळपास आहे. त्यांना सामाजिक जीवन जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचा, रोजगाराचा अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना त्यांचे हक्क मिळावे. या दृष्टीकोनातून सातत्याने किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येते. २0१५ मध्ये मुर्तिजापूरला किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन पार पडले होते. आता १ ते १0 फेब्रुवारीदरम्यान अकोल्यातील अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये राष्ट्रीय संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये किन्नरांच्या समस्यांवर चिंतन होणार आहे. तसेच नव्या किन्नरांचा परिचय सुद्धा संमेलनाच्या माध्यामातून करून देण्यात येणार आहे. संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून कलशयात्रा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)