अकोला शहरातील ‘सुपर स्प्रेड’ व्यक्तींची चाचणी; फेरीवाल्यांचे घेतले नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 07:43 PM2020-12-02T19:43:41+5:302020-12-02T19:44:01+5:30
Akola CoronaVirus News सुपर स्प्रेड व्यक्तींच्या कोरोना चाचणीला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
अकोला: दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून शहरातील सुपर स्प्रेड व्यक्तींच्या कोरोना चाचणीला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. शिवाय, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय देखील राज्याच्या आरोग्य विभागातर्फे सुचविण्यात आले होते. त्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे बुधवारी शहरातील विविध भागातील फेरीवाल्यांसह इतर सुपर स्प्रेड व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.