थाई एअरवेज कंपनीला ग्राहक मंचने दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:38 AM2020-07-11T10:38:16+5:302020-07-11T10:38:30+5:30
ग्राहक मंचने सर्व तथ्य तपासून या कंपनीला फटकारत ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शुक्रवारी दिला आहे.
अकोला : अकोला शहरातील एक दाम्पत्य थाई एअरवेज कंपनीच्या विमानाने थायलंड येथे फिरण्यासाठी गेले असता या कंपनीने योग्य त्या सुविधा न दिल्यामुळे विमान कंपनीच्याविरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. अकोला ग्राहक मंचने सर्व तथ्य तपासून या कंपनीला फटकारत ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शुक्रवारी दिला आहे.
अकोल्यातील मुस्ताक फिरोज वाघ व डॉ. शिरीन मुस्ताक वाघ हे पत्नी हे पती-पत्नी डिसेंबर २०१९ मध्ये थायलंडला सुट्या घालविण्यासाठी गेले होते. थाई एअरवेज इंटरनॅशनल पब्लिक कंपनी या कंपनीने वाघ दाम्पत्याचे मुंबई येथून थायलंडचे २ लाख ४० हजार रुपयाची तिकिटे काढली होती. वाघ दाम्पत्याला दिलेल्या विमानाच्या सेवेमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच यांच्यासमोर वाघ यांनी तक्रार दाखल करून आर्थिक दावा ठोकला होता.
या दाव्याचा निकाल देत ग्राहक मंच्याच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य सुहास आळशी, सदस्य उदयकुमार सोनवणे यांनी सदर दाव्यातील तथ्य तपासून थाई एअरवे या कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयाला ४५ दिवसांच्या आत तक्रारकर्त्यांना दिलेल्या सदोष सेवेबद्दल नुकसान भरपाई म्हणून नगदी ३० हजार रुपये देण्याचा आदेश दिला. तसेच ४५ दिवसांच्या आत पैसे न दिल्यास ९ टक्के व्याजाने सदर पैसे आकारण्याचा आदेश दिला. मुंबईस्थित या विमान कंपनीने दुय्यम प्रकारची सदोष सेवा दिली. ही बाब अर्जदाराचे वकील अॅड. सुमित महेश बजाज यांनी न्याय मंचच्या निदर्शनास आणून दिली.