जुगाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी ठाणे हजेरीचा उतारा
By admin | Published: April 27, 2017 01:29 AM2017-04-27T01:29:13+5:302017-04-27T01:29:13+5:30
एमआयडीसी पोलिसांचा फंडा, वरली व जुगारावर नियंत्रण
सचिन राऊत - अकोला
जिल्ह्यात जुगार आणि वरली अड्ड्यांना ऊत आला असून, यावर पोलीस कारवाईही करण्यात येते; मात्र ठोस कारवाई होत नसल्याने जुगारींचे हे धंदे पुन्हा फोफावत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रणासाठी एमआयडीसी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवित जुगार आणि वरली अड्डे चालविणाऱ्यांना दिवसातून सकाळ आणि सायंकाळ असे सहा तास ठाण्यात बसवून ठेवण्याचा फंडा सुरू केला आहे, त्यामुळे जुगारींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
जुगार आणि वरली अड्ड्यावर संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार कारवाई करण्यात येते; मात्र पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडूनही छापेमारी करीत कारवाई करण्यात येत आहे; मात्र ठोस कारवाईसाठी पोलिसांचे हात बांधले असल्याने हे जुगारी त्याचक्षणी जामिनावर सुटून हा जुगार आणि वरली अड्ड्यांचा धंदा जोमाने सुरू करतात. पोलीस कारवाईला न जुमानता जुगारी आणि वरली अड्डे चालविण्याचा हा धंदा बंद करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जुगारींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी संशयित आणि कारवाई करण्यात आलेल्या जुगारींची एक यादी तयार केली. त्यानंतर या जुगारींना रोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीस तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येत आहे. वरलीचे आकडे काढण्यात येतात, त्याच वेळेत या जुगारींवर करडी नजर ठेवून पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येत असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
दररोज सहा तास ठाण मांडून
वरली आणि जुगार अड्डे चालविणाऱ्यांना रोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास अशाप्रकारे दिवसातून सहा तास ठाण्यात बसवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा हा अड्डा चालविण्याचा प्रकार फसत असल्याची माहिती आहे.
इतर पोलीस स्टेशननेही राबवावा उपक्रम
एमआयडीसी पोलिसांनी जुगारींचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू केलेला बंदोबस्त शहरासह जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमध्येही राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जुगारींवर कारवाई केल्यानंतरही त्यांचे अड्डे दुसऱ्याच दिवशी चालू करण्यात येत होते. त्यामुळे पोलीस कारवाईचा त्यांना धाक उरला नव्हता; मात्र या जुगारींचा नेहमीचा बंदोबस्त करण्यासाठी हा फंडा सुरू केला आहे.
- किशोर शेळके, ठाणेदार, एमआयडीसी, पोलीस, स्टेशन.
--