कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आराेग्य व्यवस्था काेलमडली

By सचिन राऊत | Published: November 24, 2023 06:26 PM2023-11-24T18:26:31+5:302023-11-24T18:27:36+5:30

राष्ट्रीय आराेग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा परिणाम

the health system in the district has collapsed in akola | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आराेग्य व्यवस्था काेलमडली

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आराेग्य व्यवस्था काेलमडली

अकाेला : राष्ट्रीय आराेग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गत एक महिन्यापासून कामबंद आंदाेलन सुरू केले असून या आंदाेलनाचे गंभीर परिणाम आता आराेग्य सेवेवर जाणवत असल्याचे वास्तव जिल्ह्यात दिसून येत आहे. महत्वाच्या शस्त्रक्रिया, आयुष्यमान कार्ड, गाेल्डन कार्ड, लसीकरण यासह विविध आराेग्य सेवेत कार्यरत असलेल्या ८०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने आराेग्य सेवा पूर्णता काेलमडल्याने चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

शासनाच्या आराेग्य विभागातील रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत एक महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आंदाेलनस्थळी एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्यानंतर कॅन्डल मार्च काढण्यात आला. अशाेक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. त्यानंतर रांगाेळी काढून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र शासन व प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने आता आराेग्य सेवेचे कामकाजही बंद असल्याने ग्रामीण भागात आराेग्य व्यवस्था पूर्णता काेलमडल्याचे चित्र आहे. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएम अंतर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.

याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय आराेग्य अभियानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदाेलनाला आराेग्य संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: the health system in the district has collapsed in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.