...तर कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करा! - महापौरांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:55 PM2019-07-23T13:55:20+5:302019-07-23T13:55:25+5:30
स्त्यांची कंत्राटदारांनी दुरुस्ती न केल्यास प्रशासनाने मनपा निधीतून रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच संबंधित कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले.
अकोला: जलवाहिनीसह एलईडी पथदिव्यांच्या कामासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. रस्ते दुरुस्तीला विलंब होत असून, कार्यादेश (वर्क आॅर्डर) जारी झालेल्या रस्त्यांची कंत्राटदारांनी दुरुस्ती न केल्यास प्रशासनाने मनपा निधीतून रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच संबंधित कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी आढावा बैठकीत दिले.
महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांच्या दालनात बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सुवर्ण जयंती नगरोत्थान, दलितेतर, दलित वस्ती तसेच विशेष निधी अंतर्गत शहरामध्ये सुरू असलेल्या कामांच्या स्थितीची माहिती घेण्यात आली. रस्त्यांच्या कामाचे कार्यादेश प्राप्त करूनही एक वर्षापेक्षा विकास कामांना प्रत्यक्षात सुरुवात न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ््या यादीत टाकण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच २०१९-२० मधील विकास कामांसाठी सुधारित सीएसआर दराने अंदाजपत्रके तयार करण्याची सूचना महापौरांनी केली. यावेळी हद्दवाढ भागातील विकास कामांची माहिती घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती सभापती विनोद मापारी, नगरसेवक अनिल मुरूमकार, शहर अभियंता सुरेश हुंगे, सागर शेगोकार, वैकुंठ ढोरे, उपअभियंता कृष्णा वाडेकर, राजेश सरप, योगेश मारवाडी, तसेच बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची उपस्थिती होती.