अकोला : कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूचीही भीती वाढू लागली आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील चाचोंडी येथे दोन कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या दोन्ही मृत कोंबड्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून, ग्रे पॅरोट या पक्ष्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या तरी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून जिल्ह्यात कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बावणे यांनी दिली.
राज्यात विविध ठिकाणी मृत पक्षी आढळत असल्याने, नागरिकांमध्ये बर्ड फ्लूविषयी भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मृत पक्ष्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गत आठवड्यात अकोल्यातील चाचोंडी येथे दोन कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खबळब उडाली होती. पशुसंवर्धन विभागामार्फत या दोन्ही मृत कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या दोन्ही कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. याच दरम्यान ग्रे पॅरोट हा मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला असून, त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात सिरो सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली, तसेच पोल्ट्री फार्म संचालकांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिरो सर्वेक्षणांतर्गत २७८ नमुने तपासणीसाठी पाठविले
जिल्ह्यात ११ ते १४ जानेवारीदरम्यान कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण केले जात आहे. या अंतर्गत एकूण २७८ नमुने संकलित करून ते पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. हे नमुने अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
- पोल्ट्री फार्म संचालकांनी ही काळजी घ्यावी
- जैव सुरक्षिततेचे उपाय पोल्ट्री फॉर्म धारकांनी पाळणे आवश्यक आहे. वाइल्ड बर्डच्या संपर्कात येऊ देऊ नका.
- एक लीटर पाण्यात सात ग्रॅम धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) टाकून पोल्ट्री फॉर्मचा परिसर निर्जंतुकीकरण करावा.
चाचोंडी येथील दोन्ही मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षभर विविध उपक्रमांतर्गत पशूंचे नियमित रोग परीक्षण केले जाते. बर्ड फ्लूच्या निमित्ताने ११ ते १४ जानेवारीदरम्यान कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत २७८ नमुने संकलित करून पुणे येथील प्रयोग शाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला