अकोला: शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभाग नानाप्रकारचे प्रयोग करीत आहे. पायाभूत चाचणी, शाळा सिद्धी, मदर स्कूलसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता राज्यामधून १00 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी ओजस शाळा योजना राबविण्यात येत आहे; परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा योजनेमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, आदिवासी विभाग आणि समाजकल्याण विभागांतर्गत एकाही शाळेला स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्रात ओजस शाळेसाठी पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.शासनाने १४ आॅक्टोबर २0१६ च्या निर्णयानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी १00 शाळा निर्माण करण्याचे टार्गेट शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी १00 शाळा नाहीत; परंतु दहा ते बारा शाळांचा समावेश या योजनेसाठी करण्यात येतो. या योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी, मूलभूत सोयींसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येतो. विद्या प्राधिकरण पुणे मार्फत आॅनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर जाऊन जिल्हा परिषद, नगर परिषद, आदिवासी विभाग आणि समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शाळांना अर्ज करावे लागतात. अकोला जिल्ह्यातून जवळपास १६ शाळांनी अर्ज भरले होते; परंतु एकही शाळा निवडीचे निकष पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्यातील जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरखेड आणि वाशिम जिल्ह्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, साखरा या दोनच शाळांची ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली. यंदा तरी ओजस शाळेमध्ये जिल्ह्यातील शाळांना स्थान मिळावे, या दृष्टिकोनातून आवश्यक ती तयारी करून पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)ओजस आंतरराष्ट्रीय शाळा योजनेसाठी जिल्ह्यातील काही दर्जेदार शाळांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते; परंतु शाळा निवडीच्या निकषांमध्ये जिल्ह्यातील एकाही शाळेला स्थान मिळू शकले नाही. विभागातून केवळ दोनच शाळांची ओजस शाळा म्हणून निवड झाली. यावेळी पुन्हा तयारी करू.- समाधान डुकरे, ज्येष्ठ अधिव्याख्याताजिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.