अकोला: रेल्वेगाडीमध्ये संशयास्पद फिरणाºया तिघा जणांना रेल्वे पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून रोख १३४0 रुपये आणि पाच मोबाइल फोन जप्त करण्यात आले.गत काही महिन्यांपासून रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे जीआरपी पोलिसांनी रेल्वेगाड्यांमधील हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. शनिवारी रेल्वेगाडीमध्ये तिघे जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची जीआरपी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी रेल्वेगाडीत शोध घेऊन अब्दुल अतिक अब्दुल रफिक उमर (२९ रा. अलिम नगर अमरावती), मोहम्मद राशिद मोहम्मद रफिक (२७ रा. गवळीपुरा अमरावती), काशिफ खान सादिन खान (२१ रा. इतवारा बाजार अमरावती) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर तिघांनी चोरी करण्याच्या उद्देशाने रेल्वेगाडीत फिरत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या तिघांविरुद्ध हैदराबाद, सिकंदराबाद रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. आता रेल्वे पोलीस या तिघांनी केलेल्या चोरीच्या घटनांची उकल करणार आहे. ही कारवाई एएसआय एम. एस. जगताप, सुमित सैनी, पोलीस कर्मचारी नीलेश वानखेडे, नीलेश बोंडे, मोहसिन शेख, पंकज गवई व एस. पी. गवई यांच्या पथकाने केली. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाइल फोन तसेच रोख रक्कम जप्त केली. (प्रतिनिधी)