अकोला: तु बोलली नाहीस तर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेल. अशी धमकी देऊन तिचा सातत्याने पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या युवकास अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
१५ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी नितीन उर्फ उमेश सुरेश मेटांगे(२७) रा. चिंचखेड ता. पातूर हा सतत तिचा पाठलाग करायचा. घरासमोरही सातत्याने चकरा मारून हॉर्न वाजवायचा आणि गाणे म्हणायचा. त्यामुळे मुलीने ही बाब कुटूंबियांना सांगितली. कुटुंबियांनीसुद्धा उमेश मेटांगे याला समजावून सांगितले. परंतु त्याने ऐकले नाही. मुलीला त्याने, तु माझ्याशी बोलली नाहीतर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेल. अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आईने २८ एप्रिल २०१८ रोजी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पातूर पोलिसांनी आरोपी युवक नितीन उर्फ उमेश मेटांगे(२७) याच्याविरूद्ध भादंवि कलम ३५४(ड), ५०६, पोक्सो ॲक्ट ८, ११, १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस अटक करून तपास केला. आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी विधिज्ज्ञ किरण खोत यांनी बाजु मांडली. या प्रकरणाचा तपास पीएसआय विजय महल्ले यांनी केला. कोर्ट व ठाणे पैरवीचे काम पीएसआय प्रविण पाटील व पोलीस कर्मचारी रत्नाकर बागडे यांनी पाहिले.विविध कलमांनुसार शिक्षा
साक्ष व पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी नितीन सुरेश मेटांगे याला तीन वर्ष सक्त मजुरी, एक हजार रूपये दंड, न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ५०६ नुसार दोन वर्ष सक्तमजुरी, एक हजार रूपये दंड, न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, पोक्सो ॲक्टनुसार तीन वर्ष सक्तमजुरी, एक हजार रूपये दंड, न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.