प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सफाई कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:16 AM2021-04-12T04:16:55+5:302021-04-12T04:16:55+5:30
वेतन नसल्यामुळे किराणा दुकानदारांची उधारी थकल्याने त्यांनी धान्य देणे बंद केले आहे. विद्युत बिल, दूध व इतर घरगुती खर्च ...
वेतन नसल्यामुळे किराणा दुकानदारांची उधारी थकल्याने त्यांनी धान्य देणे बंद केले आहे. विद्युत बिल, दूध व इतर घरगुती खर्च कसा भागवावा, असा प्रश्न सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना भेडसावत आहे. उधार देण्यास कोणी तयार नसल्याने जीवन कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यांचा पगार थांबवून ठेवून प्रशासन सफाई कामगारांचे शोषण करीत आहे. शासनाने सफाई कामगारांना तीन महिन्यांचा थकीत पगार द्यावा आणि दर महिन्याला त्यांचा पगार वेळेवर द्यावा यासंबंधी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या मागण्या तत्काळ पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदुरी संघाचे जिल्हाध्यक्ष जय गोडाले यांनी दिला आहे. सूर्योदय होण्यापूर्वीच हातात झाडू घेऊन शहरातील संपूर्ण परिसर स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याला १ ते ५ तारखेपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित असतानासुद्धा नगर परिषद प्रशासनाकडून कधीच वेळेवर त्यांना वेतन मिळत नाही. त्यांना तुकड्या-तुकड्यात वेतन देण्यात येते.
सफाई कामगारांवर कर्जाचा डोंगर
मागील चार महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन दिलेले नाही. घरभाडे, जीवन विम्याचे हप्ते, बँकेच्या, सोसायटीच्या थकीत कर्जांचे हप्ते थकल्याने अनेक कामगारांची कुचंबणा होत आहे. पाल्यांच्या शाळेचे शुल्क थकल्याने त्यांच्यावर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. चार महिन्यांपासून पगार न झाल्याने विजेचे बिल थकीत दाखवून विद्युत वितरण कंपनीच्या वतीने अनेक सफाई कामगारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांचे प्रश्न व समस्या शासनाने निकाली काढण्याची आवश्यकता असताना, नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.