शाळा परिसरातील तंबाखु विक्रेते शासनाच्या रडारवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:56 PM2019-08-25T12:56:30+5:302019-08-25T12:56:38+5:30
तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस राज्यात बंदी असताना, शाळा व महाविद्यालय परिसरात याची सर्रास विक्री सुरू आहे
अकोला : शाळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर शासनाची नजर असून, विक्रेत्यांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंत्रिमंडळातील एका बैठकीत दिले. अकोल्यातही शाळा, महाविद्यालय परिसरात हा प्रकार सर्रास सुरू आहे; मात्र त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही.
तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीस राज्यात बंदी असताना, शाळा व महाविद्यालय परिसरात याची सर्रास विक्री सुरू आहे. कोटपा कायद्यांतर्गत काय कारवाई करण्यात आली, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळांतर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आणि दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल करण्याबाबत सूचना डॉ. पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शाळा, कॉलेजच्या आवारात छुप्या मार्गाने सुरू असलेल्या तंबाखु विक्रीला चाप बसणार असला, तरी प्रत्यक्षात मात्र सर्वत्र तंबाखु विक्री होत आहे.
अशी आहे राज्यातील स्थिती
ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणानुसार, राज्यातील २४.४ टक्के नागरिक तंबाखूचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३.८ टक्के नागरिक हे सिगारेट ओढत असल्याचे आढळून आले आहे. १५ ते १७ वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे.
दर महिन्याला द्यावा लागणार कारवाईचा अहवाल
कोटपा कायद्यांतर्गत शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे. अशा विक्रेत्यांवर कोणती कारवाई केली, किती जणांना दंड ठोठावला, याची माहिती दर महिन्याला सादर करावी लागणार आहे. तंबाखुमुक्त शाळा अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात काही विक्रेत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली असून, त्यांना कोटपा कायद्याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे.
- धम्मसेन सिरसाट, जिल्हा समुपदेशक , राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अकोला.