मनोरुग्ण वृद्धेवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:58 AM2019-12-24T11:58:12+5:302019-12-24T11:58:24+5:30
अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : ६० वर्षीय मनोरुग्ण वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अजमत शहा ऊर्फ अज्जू तयब शहा (३० रा. अडगाव खु.) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
अडगाव खु. येथील आॅटो चालक नंदकिशोर महादेव घोंगे यांनी ११ डिसेंबर २०१६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अडगाव खु. ते अकोट रोडवर एक वेडसर व अनोळखी वृद्ध महिला दिसायची. या महिलेला नंदकिशोर घोंगे हे खाद्यपदार्थ खायला द्यायचे. १० डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी त्या वृद्धेसाठी खाद्यपदार्थ घेतले आणि घोंगे हे गावातील काही लोकांसह अडगाव खुर्द फाट्यावर गेले; परंतु फाट्यावर ही वृद्ध महिला दिसली नाही़ त्यामुळे घोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृद्धेचा शोध घेतला असता, रोडच्या दुसºया बाजूला गावातील अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी अजमत शहा यास पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पळून गेला. घोंगे यांच्या तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी अजमत शहा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(जे)(एल) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने एकूण १५ साक्षीदार तपासले. आरोपी अजमत शहा याच्याविरुद्ध साक्ष व सबळ पुरावे असल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ अजित देशमुख यांनी बाजू मांडली. लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईक यांनी केला होता. (तालुका प्रतिनिधी)