निसर्गप्रेमी युवकाने सतत १२ वर्षे पाणी देऊन जगविली झाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:34+5:302021-06-19T04:13:34+5:30
अकोला : वृक्षारोपण करणे सोपे आहे; पण ते जगविणे, वृक्ष जगविण्यासाठी धडपड करणे हे तसे जिकिरीचे काम आहे; मात्र ...
अकोला : वृक्षारोपण करणे सोपे आहे; पण ते जगविणे, वृक्ष जगविण्यासाठी धडपड करणे हे तसे जिकिरीचे काम आहे; मात्र शहरातील डाबकी रोड भागातील रमेश नगरमधील रहिवासी सुनील गोहर यांनी सतत १२ वर्षांपासून लावलेल्या रोपांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जगवून, वाढवून त्यांचे यशस्वी संगोपन केले आहे. असे जवळपास ११०० च्यावर रोपांची शहर परिसरात लागवड केली आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या जन्मापासून या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली आहे.
पावसाळा सुरू होताच सर्वत्र वृक्षारोपणाचे कार्यक्रम पहावयास मिळतात. अनेक सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी यंदादेखील वृक्षारोपण कार्यक्रम राबवतील. वृक्षारोपणाचे फोटो सोशल मीडियात बरीच मोठी जागा बळकावतील. हे असे प्रकार आपण दरवर्षी अनुभवत आहोत; पण अकोला शहरातील एका युवकाने वृक्ष लागवडीची सोबत जगविण्याची चळवळच सुरू केली आहे. डाबकी रोड भागातील सुनील गोहर हे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. ते शहरात विविध उपक्रम राबवित असतात. १२ वर्षांआधी मुलगी झाल्याच्या आनंदात त्यांनी वृक्ष लागवडीचा निश्चय केला. आपण निसर्गाचे काही देणे लागतो, यानुसार वृक्ष लागवडीसोबत जगविण्यासाठी पुढाकार घेतला. शहरातील शासकीय कार्यालय, शाळा, एमआयडीसी परिसर व विविध ठिकाणी रोपांची लागवड केली.
स्वत: पाणी देऊन फुलवली हिरवळ!
पावसाळा, हिवाळा व कडक उन्हाळ्यात व्यवस्थित संगोपन करून शहरातील मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, डाबकी रोड रेल्वेगेट परिसर येथे नेत्रसुखद हिरवळ फुलवली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी ही वृक्ष अव्याहत स्वतः पाणी देऊन जगवणे तसे खूप जिकिरीचे काम होते; पण या अवलिया युवकाने ते मोठ्या नेटाने व सातत्याने केले आहे.
शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष जगविली. आजही दररोज रोप लावून स्वत: पाणी देत आहे, तसेच वृक्ष लागवडीविषयी जनजागृती व्हावी, याकरिता रॅलीही काढली होती. आज रोजी बहुतांश झाडे डौलाने उभी असल्याने समाधान वाटते.
- सुनील गोहर, सामाजिक कार्यकर्ता.