रोजगाराच्या शोधात सातपुड्यातील आदिवासींचे स्थलांतर!
By admin | Published: September 12, 2016 02:40 PM2016-09-12T14:40:41+5:302016-09-12T14:40:41+5:30
अकोला व अमरावती जिल्ह्यात मूग, सोयाबिन तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, या दोन्ही जिल्ह्यांमधील गावागावांमध्ये शेतमजूरांची प्रचंड टंचाई आहे.
Next
>नितिन गव्हाळे, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - गत पंधरा दिवसांपासून अकोला व अमरावती जिल्ह्यात मूग, सोयाबिन तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, या दोन्ही जिल्ह्यांमधील गावागावांमध्ये शेतमजूरांची प्रचंड टंचाई असल्याने शेतक-यांना सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी राहणा-या आदिवासी शेतमजूरांचा आधार घ्यावा लागत आहे. सातपुडा भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे आदिवासी बांधव अल्पकाळासाठी स्थलांतर करीत आहेत. अकोला व अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतकºयांकडे आदिवासी मजूर मुक्कामासाठी आले आहेत.
गत काही दिवसांपासून मूग व सोयाबिन तोडणीला सुरूवात झाली आहे. गावांमध्ये मजूर नसल्यामुळे शेतकºयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. मूग व सोयाबिन तोडणीसोबतच शेतातील निंदण, खुरपण करण्यासाठी गावोगावच्या शेतकºयांनी सातपूडा भागात जावून आदिवासी मजूरांना स्वखर्चातून आपल्या गावी आणले आहेत. सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली आदिवासी बांधवांच्या गावे पुर्णत: खाली झाली आहेत. गाठीला पैसा आणि पोटाला भाकर मिळत असल्याने, हजारो आदिवासी मजूर मुलाबाळांसह खेड्यापाड्यातील शेतकºयांकडे कामाला आले आहेत. शेतकºयांनी सुद्धा त्यांना डोक्यावर छत, त्यांच्या भाकरतुकड्याची सोय करून त्यांना योग्य मोबदला दिल्यामुळे दरवर्षी आदिवासी मजूर शेतांमध्ये कामाला येत आहेत. अलिकडच्या दोन वर्षांमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढले आहेत. मूग, सोयाबिन तोडणीचा हंगाम संपल्यानंतर आदिवासी मजूर त्यांच्या गावी परत जातात. अकोला जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, अकोला तालुक्यांसोबतच अमरावती जिल्ह्यांमधील दर्यापूर, अंजनगाव, चांदूरबाजार आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदूरा, मलकापूर आदी भागांमध्ये आदिवासी मजूर शेतीकामासाठी आले आहेत. त्यांची व्यवस्थित बडदास्त ठेवण्याचा शेतकरी बांधव प्रयत्न करीत आहेत.
आदिवासी मजूरांना मिळतोय योग्य मोबदला
आदिवासी बांधव हे अल्पभूधारक आहेत. सातपूडा भागामध्ये फारसे रोजगार उपलब्ध नसल्याने, शेतीकाम करूनच आदिवासींना उदरनिर्वाह भागवावा लागतो. गावोगावच्या शेतकºयांना आदिवासी मजूर बांधवांनी मोठा आधार दिला आहे. ६0 टक्के मूग तोडणीचे काम पूर्ण झाले आहे. गावातील मजूरापेक्षा आदिवासी मजूर निक्षून मूगाच्या शेंगा तोडत असल्याने, शेतकरीही समाधानी आहेत. सध्या पाच रूपये किलोदराप्रमाणे मूगाची शेंग तोडल्या जात असून, एका घरातील चार ते पाच माणसे एक ते सव्वा क्विंटलपर्यंत मूगाच्या शेंगा तोडत आहेत. त्याचा योग्य मोबदलाही शेतकºयांकडून त्यांना दिला जात आहे. तसेच राहण्यासाठी छत, शिधाआटा, गहू, तांदूळ, तूरीची डाळ, कपडेलत्ते सुद्धा शेतकºयांकडून आदिवासी मजूरांना पुरविण्यात येत आहेत.