लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : शहरात वाहतूक नियमांना तिलांजली देणाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे. गत दहा महिन्यात २८ हजार वाहनचालकांना जवळपास ४० लाखांचा दंड ठोठावला. तरीही शहरातून ट्रिपल सीट वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते. कोरोना काळात मास्कचा वापर न करता वाहन चालविणे, सोबत कागदपत्रे न बाळगणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे आदी प्रकरणी पोलीस प्रशासनाने वाहनचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली. अकाेला शहरातील सर्वच मुख्य चाैक तसेच शहराबाहेर जाणारे मार्ग यावर वाहतूक पाेलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे या प्रमुख ठिकाणी पाेलीस बंदाेबस्त तैनात करून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकाविरुद्ध कारवई केली जाते. गेल्या दहा महिन्यात जवळपास ५५१ ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवई केली परंतु अद्यापही ट्रिपल सीट वाहनाचा बिनधास्त प्रवास सुरू असल्याचे दिसून येते. पोलीस कारवाईनंतरही वाहनचालक बेफिकीर असल्याचे दिसून येते. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ट्रिपल सीट व मास्कचा वापर न करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दुसरीकडे वाहनचालक अजूनही बिनधास्त असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याबरोबरच ट्रिपल सीट वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
दीड महिन्यात १७३ वाहनांवर करावाई
गत १० महिन्यांपासून वाहनचालकाविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र १२ ऑक्टाेबर ते १५ नाेव्हेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत तब्ब्ल १७३ वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून ५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पाेलिसांनी दिली.
कारवाईचा वेग वाढणार
ऑक्टोबर महिन्यात शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेतून १७३ नागरिकांना दंड ठोठावण्यात आला. यामध्ये मास्कचा वापर न करणे आणि ट्रिपल सीट वाहने चालविणे या दोन प्रकारातील कारवाईची अधिक समावेश होता. नोव्हेंबर महिन्यातही कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. दुसरीकडे पोलिसांना गुंगारा देत काही वाहनचालक ट्रिपल सीट जात असल्याचे दिसून येते. यासाठी छुप्या मार्गाचाही वापर होत असल्याचे दिसते. नोव्हेंबर महिन्यात कारवाईच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पाेलीस शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी दिली.