उमरा येथे कृ त्रिम पाणीटंचाई: पिण्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:36 AM2018-01-10T01:36:38+5:302018-01-10T01:36:54+5:30
पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा-रांगरा गट ग्रामपंचायत असून, त्यामध्ये ११ सदस्य आहेत, तसेच त्या गावात चावडीची विहीर, वाढाची विहीर, खिडकीची, चांभारवाड्यातील, बुद्ध विहारातील व स्टँडवरील अशा सहा सार्वजनिक विहिरी आहेत; मात्र एक महिन्यापासून यापैकी एकाही विहिरीस पाण्याचा थेंब नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा-रांगरा गट ग्रामपंचायत असून, त्यामध्ये ११ सदस्य आहेत, तसेच त्या गावात चावडीची विहीर, वाढाची विहीर, खिडकीची, चांभारवाड्यातील, बुद्ध विहारातील व स्टँडवरील अशा सहा सार्वजनिक विहिरी आहेत; मात्र एक महिन्यापासून यापैकी एकाही विहिरीस पाण्याचा थेंब नाही. त्यासंबंधी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना विहिरीचे पाणी आटले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा किंवा विहीर अधिग्रहण करा व ग्रामस्थांना पाणी द्या हे वारंवार तोंडी सांगितले; पण दीड महिना झाला तरी ग्रामपंचायतने पाण्याची व्यवस्था केली नाही. असे तक्रारकर्त्याने तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे. म्हणून उमरा येथील ग्रामस्थ अजाबराव वैदुराम गवई यांनी पिण्याच्या पाण्यासाठी १५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंबंधीची तक्रार २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व गटविकास अधिकारी यांना दिली आहे. तसेच तक्रारीच्या निवारणासाठी आठ दिवसांचा अवधीसुद्धा दिला होता; मात्र अजूनपर्यंतसुद्धा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत, हे मात्र खरे आहे.
बाळापूर येथील पाणी पुरवठा विभागाने सहा ते सात दिवसांपूर्वी सावरगाव रोडवरील भोंडी तलावाजवळील संजय संपत मुळे यांच्या शेत सर्व्हे नं. ८४/१ मधील विहिरीला भेट देऊन त्या विहिरीची पाहणी केली असता त्या विहिरीला सद्यस्थितीत ३३ फुटांच्यावर मुबलक पाणी साठा आहे; परंतु त्या विहिरीला अधिग्रहण करावे लागते; मात्र ग्रा.पं.च्या हलगर्जीपणाच्या धोरणामुळे त्या विहिरीचा अधिग्रहणाचा प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पंधरा दिवसांपासून चावडीच्या विहिरीत पाणी सोडणे सुरू आहे.
- लक्ष्मीबाई श्रीकृ ष्ण धानोरे, सरपंच, उमरा.
बाळापूर पाणी पुरवठा विभागाने गावाबाहेरील विहिरीची पाहणी केली असून, तिचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- एस. एस. उंडाळ, ग्रामसेवक, उमरा.