बोरगाव मंजू / वणी-रंभापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येत असलेल्या आॅटोरिक्षाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक शाळकरी मुलगी ठार झाली, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बायपास नजीक शनिवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडली. पुजा राजेंद्र इंगळे (१५ वर्षे, रा. निपाना)असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.निपाणा येथून प्रवासी वाहतूक करणारी आॅटोरिक्षा (एम. एच. ३० ए. एफ. ४२०१) या वाहनातून बोरगाव मंजु कडे प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी बोरगाव मंजूकडून एम. एच. ४० एके ०२९९ क्रमांकाचा ट्रक मुर्तीजापूरकडे जात होता. महामार्गावरील नवीन बायपास नजीक या दोन वाहनात अपघात झाला. आॅटोरिक्षा मधील पुजा राजेंद्र इंगळे या अपघातात घटनास्थळावर ठार झाली. पुजा ही बोरगाव मंजू येथे इयत्ता अकरावीत शिकत होती.ती निपाणा येथील संरपच कुमुदिनी इंगळे यांची मुलगी आहे. या अपघातात आॅटोरिक्षामधील शेषराव इंगळे, निकीता राऊत, शुभम राउत, प्राजक्ता राउत, वैष्णवी निचळ (सर्व राहणार निपाणा) गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजय मगर सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. वृत्त लिहीस्तोवर सदर अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.