तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांनी पडलेला मोबाइल उचलला; पुंडकर यांच्या मोबाइल कॉलिंगची पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:14 AM2020-02-26T11:14:23+5:302020-02-26T11:14:31+5:30
घटनास्थळापासून शहरातील सीसी फुटेज आणल्यानंतरही कुठलाही सुगावा किंवा संशयास्पद ओळख परेड झालेली नाही.
- विजय शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : गोळीबार होऊन ९६ तास उलटूनही प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाच्या तपासात पोलीस यंत्रणा गुंतली आहे. पोलीस प्रशासनातील मनुष्यबळाने आपला तपास सुरूच ठेवला असता तरी मात्र या हत्याकांडाच्या मास्टर प्लॅनच्या टेक्निकल तपासावर पोलीस भर देत आहेत. तुषार यांच्या मोबाइल कॉलिंगचा डाटानुसार नंबरची पडताळणी करून हत्याकांडासंबंधीचे नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करीत असले तरी मात्र अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा लागला नाही.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत निर्दयीपणे तुषारच्या शरीरात गोळ्या घालून ज्या घटनास्थळावर हत्या केली, त्या घटनास्थळापासून शहरातील सीसी फुटेज आणल्यानंतरही कुठलाही सुगावा किंवा संशयास्पद ओळख परेड झालेली नाही. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमार्फत माहितीचे जाळे विणले आहे; परंतु ठोस माहिती काढत असतानाच पोलिसांनी आता टेक्निकलच्या आधारावर तपासाला प्रारंभ केल्याची माहिती आहे. तुषार यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरील एका रस्त्यावर भरधाव वेगाने मोटारसायकल घेऊन जाणाºयांचा मोबाइल खाली पडल्यानंतर तो उचलण्यात आल्याचे सीसी कॅमेºयात कैद झाले आहे. त्यामुळे मोटारसायकलवर असलेले अनोळखी दोघे जण हल्लेखोर असावेत, असा संशय बळावत आहे. शिवाय तुषार हे दूध डेअरीमधून फोनवर बोलत बाहेर निघून अंधाराकडे गेल्यानंतर हल्लेखोरांनी तुषारवर गोळीबार करत डाव साधला.
त्यामुळे हल्लेखोरांच्या मदतीला तुषारच्या हालचालीवर पाळत ठेवत मोबाइलवर माहिती दिल्या गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विविध ठिकाणी संशयास्पद इसमांवर पाळत व शोधकामी पथके तयार करण्यात आली असली तरी मात्र तुषारच्या हत्येचा तपास तांत्रिकदृष्ट्या मोबाइल नेटवर्कवर केंद्रित केला असल्याचे समजते. हत्येच्या दिवशी तुषारच्या मोबाइलवर जवळपास १५० आउटगोइंग - इनकमिंग कॉल झाले असल्याचा अंदाज आहे. या सर्व मोबाइल नंबरची पडताळणी पोलीस करीत असून, संबंधितांचे बयान नोंदवित आहेत. शिवाय घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या मोबाइल टॉवर अंतर्गत वारंवार कॉलिंग होणारे व संशयास्पद मोबाइल नंबरच्या डाटावरूनसुद्धा छाननी करण्यात येत आहे.