शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:54 PM2019-06-02T13:54:01+5:302019-06-02T13:56:09+5:30
तेल्हारा (जि. अकोला): पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे घडली.
- प्रशांत विखे
तेल्हारा (जि. अकोला): पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे घडली. रोहित विनोद वानखडे (१२) आणि देवा गजानन वानखडे (११) अशी या बालकांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी बुडालेल्या या दोन बालकांचे मृतदेह रविवारी दुपारी काढण्यात आले.
रोहित व देवा हे दोघे शनिवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास गावालगतच्या एका शेतात असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. रात्री उशीरापर्यंत ते घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. यावेळी दोन्ही बालकांचे कपडे व चपला शेततळ्याच्या काठावर आढळून आली होती. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तळ्यात बालकांचा शोध घेतला; परंतु त्यांना यश आले नाही. बालकांचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील आपात्कालीन बचाव पथकासही पाचारण करण्यात आले होते. अखेर रविवारी दुपारी दोन्ही बालकांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ठाणेदार विकास देवरे व नायब तहसिलदार सुरळकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.