राज्यात दोन कोटीवर बीटी कपाशीचे पाकीट मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 02:40 PM2019-05-25T14:40:53+5:302019-05-25T14:40:57+5:30
कृषी विभागाने यावर्षी आतापर्यंत २२६ लाख बीटी कपाशीचे पाकीट उपलब्ध केले. १ जूनपासून शेतकऱ्यांना बाजारात हे बियाणे मिळणार आहे.
अकोला: राज्यात ४२ लाख हेक्टरवर कपाशी पेरणीची शक्यता असल्याने या क्षेत्रासाठी १६५ लाख पाकिटांची गरज आहे. कृषी विभागाने यावर्षी आतापर्यंत २२६ लाख बीटी कपाशीचे पाकीट उपलब्ध केले. १ जूनपासून शेतकऱ्यांना बाजारात हे बियाणे मिळणार आहे. दरम्यान, बोगस एचटीबीटी कपाशीची विक्री सुरू असल्याने आतापर्यंत १० पोलीस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
यावर्षी कपाशीला चांगले दर मिळाल्याने कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात कृषी विद्यापीठ, कृषी विभागाला यश आले. तथापि, मान्सूनच्या आगमनावर कपाशीची पेरणी ठरेल. असे असले तरी शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण व टंचाई भासू नये यासाठी यावर्षी कृषी विभागाच्यावतीने मुबलक बीटी कपाशी बियाण्यांचे नियोजन करण्यात आले.
राज्यातील खरीप हंगामाचे क्षेत्र बघता कृषी विभागाने यावर्षी १६.२४ लाख क्विंटल बियाण्यांची मागणी केली. महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज) महामंडळ तसेच राष्टÑीय बियाणे महामंडळ व खासगी कंपन्याकडून एकूण १७.०३ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध केले. राज्यात यावर्षी ४३.५० लाख मे. टन रासायनिक खताची मागणी असून, १५ मेपर्यंत ३१.१० मे. टन रासायनिक खताचा साठा उपलब्ध करण्यात आला. कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागामार्फत यावर्षी दक्षता घेत १९,३५७ बियाण्याचे, २० हजार रासायनिक खताचे तर ८ हजार कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे लक्ष्यांक देण्यात आले.
दरम्यान, केंद्र शासनाची मान्यता नसलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्यांची राज्यात सर्रास विक्री होत असल्याने असे बियाणे विक्री करणाºया संबंधितावर पोलीस केसेस दाखल करण्यात येत आहेत. मार्च, एप्रिलमध्ये तसेच आतापर्यंत १० पोलीस केसेस गुणनियंत्रण विभागाने दाखल केल्या. त्यांच्याकडून ४,५१६ पाकिटे व १,०८७ क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. याची किंमत ६५ लाख रुपये आहे. तसेच ४१०५.८५ मे. टन अनधिकृत रासायनिक खताचा साठा सापडल्याने ५ पोलीस केसेस दाखल करण्यात आल्या असून, खताचा साठा जप्त करण्यात आला.