खेट्री : येथील विश्वमित्र नदीपात्रात वाळूचे उत्खनन करणारे समजून पातूरच्या महसूल पथकाने चक्क दोन तरुण शेतकऱ्यांना मारहाण केल्याची घटना ५ डिसेंबर रोजी रात्री घडली. या मारहाणीमध्ये दोन्ही तरुण शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत.खेट्री येथील विश्वमित्र नदीपात्रामध्ये वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या पथकाने गुरुवारी रात्री खेट्री येथील विश्वमित्र नदीपात्रात धाव घेतली. त्या ठिकाणाहून दोन वाळू माफिया दुचाकीवर पसार होण्यात यशस्वी झाले; मात्र त्याच वेळी खेट्री येथील दोन तरुण शेतकरी कपाशी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जात होते. महसूलच्या पथकामध्ये ६ ते ८ जणांपैकी संरक्षणसाठी असलेल्या गार्डसह तीन जणांनी विचारपूस न करता थेट निरपराध असलेल्या शेतकºयांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोन्ही तरुण शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी खेट्री येथील शेतकरी सलीम खा व रिजवान खान यांनी शुक्रवारी अज्ञात पथकाच्या संरक्षण गार्डसह तीन जणांविरुद्ध चान्नी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आम्हाला पथकातील दोन जणांनी पकडले होते आणि संरक्षण गार्ड यांनी पाइपने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रकरण पोलिसांनी चौकशीत ठेवले आहे. दोघांना चतारी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेले असता, एकाच्या गुडघ्याला मार आहे, तर दुसºयाच्या पायावर काठीने मारहाण केल्याचे व्रण असल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)वाळूची अवैध वाहतुकसंदर्भात कारवाईसाठी गेलो असता, दोन मोटरसायकलवर काही जण आले. त्यापैकी एका मोटरसायकलवरील व्यक्ती पळून गेले. राहिलेले दोन युवक पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्यावर संशय आल्याने पकडण्याच्या झटापटीमध्ये गार्डची काठी लागली. त्यांना मारहाण करण्याचा उद्देश नव्हता.- दीपक बाजड, तहसीलदार पातूर.महसूल पथकाने दोघांना मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली असून, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.- गणेश वनारे, ठाणेदार पोलीस स्टेशन चान्नी.
वाळू माफिया समजून दोन शेतकऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 2:28 PM