अकोला : स्थानिक अकोला क्रिकेट क्लब, विदर्भ क्रिकेट संघटनेचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे, मध्यम गती गोलंदाज आदित्य ठाकरे या दोघांची रणजी ट्रॉफी स्पर्धेकरीता विदर्भ संघात निवड झाली आहे. विदर्भ संघ इलाईट ‘अ’ग्रुपमध्ये असून, पहिला सामना दि. ५ ते ८ जानेवारीला नागपूर इथे होणार आहे.
दर्शन नळकांडे याने यापूर्वी विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर १९ वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कपकरिता मलेशिया येथे १९ वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो सहा वर्षापासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करित असून, आय. पी. एल स्पर्धेतही तो खेळणार आहे. आदित्य ठाकरे मध्यमगती गोलंदाज असून, त्याने सुद्धा यापूर्वी विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्वासह भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे न्युझ्लंड येथे १९ वर्षाखालील झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेचे भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे.
गेल्या १० वर्षापासून क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नांव राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर नेले असून, हि बाब जिल्ह्यातील खेळाडूंकरिता प्रेरणादायी तसेच आत्मविश्वासात भर टाकणारी आहे. अकोल्यातून दोन खेळाडूंची निवड जिल्ह्याकरीता अभिमास्पद असल्याची माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली. खेळाडूंना अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अशोक तापडिया, उपाध्यक्ष गुरमंदरसिंग छतवाल, सचिव ओम्रकाश बाजोरिया, सहसचिव नरेंद्र पटेल, ऑडीटर मधुकर घोंगे, कर्णधार जावेदअली, सदस्य श्रीराम झुनझुनवाला, शरद अग्रवाल, मनोहर अगडते क्लबचे मार्गदर्शक विजय देशमुख तसेच अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा हौशी क्रिकेट संघटनाच्या सदस्यांनी मार्गदर्शन केले आहे.
अकोल्याचा गणेश भोसले याची सी. के नायडू स्पर्धेसाठी निवड
अकोला क्रीकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा फिरकी गोलंदाज गणेश भोसले याची २३ वर्षाखालील सी. के. नायडू स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे. यापूर्वी गणेश भोसले याने १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व तसेच १६ वर्षाखालील मध्य विभागाचे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २३ वर्षाखालील सी. के. नायडू विदर्भ संघ इलाईट ‘बी’ ग्रुपमध्ये असून, पहिला सामना दि. ७ ते १० जानेवारी २०२४ नागपूर येथे होणार आहे.