इंग्लंडहून परतले; अकोल्यात राहुन गेले...नागपुरात ‘पॉझिटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 11:46 AM2020-12-27T11:46:04+5:302020-12-27T11:50:50+5:30

Corona New strain : त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्थची लागण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Two guests who stayed in Akola are 'positive' in Nagpur! | इंग्लंडहून परतले; अकोल्यात राहुन गेले...नागपुरात ‘पॉझिटिव्ह’!

इंग्लंडहून परतले; अकोल्यात राहुन गेले...नागपुरात ‘पॉझिटिव्ह’!

Next

अकोला: अकरा दिवसांपूर्वी अकोल्यात पाहूणे म्हणून आलेले नागपुरातील दोन रहिवासी शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आले. या दोन्ही व्यक्ती इंग्लंड येथून परतल्या असून, त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. यातील एका पाहुण्याच्या नातेवाइकांचा शोध लागल्याची माहिती असून, दुसऱ्या पाहुण्याचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत विदेशातून नागपुरात दाखल झालेल्या नागरिकांनी कोविड चाचणी करावी, असे आवाहन नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार, अशा नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. यामध्ये इंग्लंडहून परतलेल्या दोघांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले असून, या दोन्ही रुग्णांनी १३ ते १५ डिसेंबर दरम्यान अकोल्यात त्यांच्या नातेवाइकांकडे मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोल्यातील आरोग्य विभाग सतर्क झाला असून, त्या रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील एका रुग्णाच्या नातेवाइकांचा शोध लागला असून, दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांची शोध मोहीम सुरू आहे.

 

त्या दोन्ही रुग्णांचे नमुने पाठविले पुण्याला

नागपुरात पॉझिटिव्ह आलेले दोन्ही कोविड रुग्ण इंग्लंडहून परतल्याने त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्थची लागण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचे नमुने पुणे येथील ‘एनआयव्ही’लॅब मध्ये पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्याचे अहवाल पाच दिवसांनी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

संपर्कातील नातेवाइकांची चाचणी

दोन पैकी एका रुग्णाच्या नातेवाइकांच्या कुटुंबाची माहिती मिळाल्याची माहिती आहे. या कुटुंबातील नातेवाइकांचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विदेशातून २४ जण अकोल्यात दाखल

विदेशातून अकोल्यात दाखल झालेल्या २४ जणांची यादी आरोग्य विभागाला मिळाल्याची माहिती आहे. यामध्ये २४ डिसेंबर रोजी मिळालेल्या पहिल्या यादीत ९, तर २५ डिसेंबर रोजी मिळालेल्या यादीत १५, अशा एकूण २४ जणांचा समावेश आहे. यादीत काही व्यक्तींच्या नावांचा पुन्हा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांंनी दिली.

 

मागील १५ दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वत:ला होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. लक्षणे दिसताच त्यांनी थेट आरोग्य विभागाशी संपर्क साधून कोविड चाचणी करून घ्यावी. नागपूरमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या अकोल्यातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.

Web Title: Two guests who stayed in Akola are 'positive' in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.