अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींना शुक्रवार, १८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवित दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यापूर्वी न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली होती.प्राप्त माहितीनुसार, मार्च २००६ मध्ये अकोट फैल पोलीस ठाण्यात अकबर प्लॉट येथील रहिवासी सै. मोमीन सै. युनूस यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार अकबर प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद फैयाज नूर मोहम्मद, मोहम्मद इलियास नूर मोहम्मद, मोहम्मद अय्याज नूर मोहम्मद यांनी जुन्या वादावरून सै. मोमीन सै. युनूस यांना मारपीट केली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांची जमानतीवर सुटका केली होती. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल मधुकर पाटील यांनी घटनेचा पुन्हा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीवेळी सरकारी पक्षाकडून सादर केलेल्या पुराव्यावरून न्यायाधीशांनी आरोपींना दोषी ठरवित दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय, प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षेमध्ये सहा महिन्यांची वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.