अकोला: विदर्भाची कृषी पंढरी म्हणून लौकिक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अधिग्रहित करण्यात आल्याने येथील शरद सरोवर तोडण्यात येणार आहे. या जागेवर असलेले कृषी पर्यटन केंद्राचे साहित्यही हलविण्यात आले आहे. विदर्भात एकाच वेळी ४ ते ५ हजार लोकांना रोजगार देणारी अकोल्याची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ही एकमेव संस्था आहे; परंतु अकोल्याच्या शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करायचा असल्याने शासनाने या विद्यापीठाची व खासगी मिळून ८६.८५ हेक्टर जागा अधिग्रहित केली आहे. यामध्ये कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र सर्व्हे ५ अंतर्गत कृषी विद्यापीठाची मुख्य धमनी असलेला शरद सरोवर, फळ संशोधन केंद्र, या विभागांतर्गत येत असलेले पक्के बांधकाम तीन इमारती आहेत. सर्व्हे क्रमांक १३ मध्येही शरद सरोवराचा भाग येतो. तसेच दोन विहिरी, माळी प्रशिक्षण केंद्र, पाच पक्के बांधकाम असलेल्या इमारती आहेत. तसेच इतर बांधकामासह निंबू रोपवाटिका, कीटकशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाचे प्लॉट,आंतरपीक संशोधन बांधकाम व प्लॉट, दोन विहिरी, आवळ्य़ाची ४५0 झाडे मिळून ८६.८५ हेक्टर जागा या विस्तारीकरणात गेली आहे. शरद सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमनी आहे. येथूनच ग्रॅव्हिटीने शेकडो हेक्टर संशोधन क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. सन १९७५ मध्ये शरद पवार यांच्याहस्ते या सरोवराचे उद्घाटन करण्यात आले होते. या सरोवरामुळे या भागात कृषी पर्यटन केंद्र कृषी विद्यापीठाने सुरू केले होते. त्यामुळे या भागात चैतन्य निर्माण झाले होते. बैलाची डमणी, नागमोडी रस्ता, हिरवळ हे अकोलेकरांना भुरळ घालत होते; परंतु विमानतळाच्या विस्तारीकरणात आता हे सरोवर इतिहासजमा होणार आहे. येथील कृषी पर्यटन साहित्यही हलविण्यात आले आहे.
अखेर शरद सरोवर तोडणार !
By admin | Published: July 20, 2016 1:39 AM