आशीष गावंडे/ अकोलामहापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश आहे. संभाव्य हद्दवाढ लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामपंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहे. सदर बांधकामे तातडीने न थांबवल्यास संबंधित तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचा महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी स्पष्ट इशारा दिला होता प्रत्यक्षात मात्र हा इशारा हवेत विरल्याचे चित्र आहे. मनपाच्या हद्दवाढीच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण होणार असून, मनपा क्षेत्रात शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश होईल. शासनाकडे विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल)चा प्रस्ताव विचाराधीन असून, निश्चितच चटई निर्देशांक (एफएसआय)मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्यडीसी रूलह्ण लागू होत नाही, तोपर्यंत इमारतींचे अवाजवी बांधकाम बंद करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी जारी केले आहेत. त्यानुसार शहरात व्यावसायिक तसेच रहिवासी इमारतींचे बांधकाम ठप्प पडून आहे. यादरम्यान, शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हद्दवाढ होईल या विचारातून बांधकाम व्यावसायिकांनी सदनिका (फ्लॅट) विकण्याचा सपाटा लावला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने बंद करण्याच्या मुद्यावर आयुक्त अजय लहाने यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित ग्रामपंचायतचे तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांची बैठक घेऊन इमारतींचे बांधकाम तत्काळ बंद करण्याचा आदेश दिला होता. सदनिका, दुकानांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले असतील तरीही संबंधित तलाठी, ग्रामसेवक, सरपंचासह कंत्राटदाराविरोधात पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचे आयुक्त लहाने यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. हद्दवाढीच्या हालचाली पाहता मनपा आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा दाखवत ग्रामपंचायत क्षेत्रात अनधिकृत बांधकामे तातडीने पूर्ण केली जात आहेत.
ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सपाटा
By admin | Published: July 19, 2016 2:02 AM