‘जीएमसी’त आढळला अनोळखी मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:04 PM2019-08-13T14:04:53+5:302019-08-13T14:05:08+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली

 Unidentified body found in 'GMC' Akola | ‘जीएमसी’त आढळला अनोळखी मृतदेह!

‘जीएमसी’त आढळला अनोळखी मृतदेह!

Next

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली; परंतु या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याऐवजी येथे कार्यरत शासकीय सोशल वर्करने काढता पाय घेतला. त्याच्या या वर्तनामुळे तास-दीड तास मृतदेह अपघात कक्षातच पडून होता.
सर्वोपचार रुग्णालय परिसरात सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास एका वयोवृद्ध अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. परिसरात मृतदेह असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी अपघात कक्षात कार्यरत सीएमओ डॉ. श्याम गावंडे यांना दिली. पुढील कार्यवाहीसाठी डॉ. गावंडे यांनी तत्काळ महाविद्यालयाचे शासकीय सोशल वर्कर मंगेश ताले यांना घटनास्थळी बोलाविले. शासकीय सोशल वर्कर ताले घटनास्थळी पोहोचले; मात्र त्यांनी या प्रकरणातून काढता पाय घेत सीएमओ डॉ. श्याम गावंडे यांच्यासोबत वाद घातला. या प्रकारामुळे संतप्त डॉक्टरांनी डॉ. श्यामकुमार सिरसाम आणि अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याशी संपर्क साधत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉ. सिरसाम यांनीदेखील सोशल वर्कर ताले यांच्याशी संपर्क साधत पुढील कार्यवाही करावयाचे सांगितले; परंतु त्यानंतरही त्यांनी बेजबाबदार वर्तणूक करीत तेथून काढता पाय घेतला; मात्र या प्रकरणात तास-दीड तास अनोळखी मृतदेहाची अवहेलना झाल्याचे सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी डॉक्टरांची मदत करीत मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा मार्ग मोकळा केला.

शासकीय सोशल वर्कर ठरताहेत अकार्यक्षम
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी एमएसडब्ल्यू सोशल वर्कर हे पद असून, या पदावर पगारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णांना येणाºया अडचणी सोडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच इतर समाजकार्याशी निगडित कार्य त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत; परंतु जीएमसी प्रशासनातर्फे या कर्मचाऱ्यांना इतरत्र कार्यरत करण्यात आले आहे. शिवाय, जे सोशल वर्कर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत, तेदेखील अकार्यक्षम ठरत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

हा गंभीर प्रकार आहे. उद्या या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

Web Title:  Unidentified body found in 'GMC' Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.