लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायदा २०१६ अन्वये विद्यापीठ आणि महाविद्यालयीन निवडणुकांची अधिसूचना जारी झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालये आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेची निवडणूक येत्या ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी निवडणूक आणि मतमोजणी होईल, असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.महाविद्यालय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विद्यार्थी संघ आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना बुधवारी अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली. यात १३ आॅगस्ट रोजी निवडणूक कार्यप्रणाली, विहित नमुने आणि अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. तसेच महाविद्यालयाकरिता मागासवर्ग प्रतिनिधी आरक्षण सोडत केली जाणार आहे. १६ आॅगस्ट रोजी तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध के ली जाईल. १९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यत मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदविता येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता सक्षम अधिकारी मतदार यादी प्रसिद्ध करतील.२० व २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान नामनिर्देशन दाखल करावे लागेल. २२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देश अर्जाची छाननी आणि सायंकाळी ५ वाजता वैध व अवैध नामनिर्देशन अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. २४ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन अर्ज वैध असल्यास निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप सादर करावा लागेल.२६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन आक्षेपाबाबत सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा लागेल आणि सायंकाळी ५ वाजता अपिलानंतर अंतिम नामनिर्देशन अर्जाची प्रसिद्धी होईल. २७ आॅगस्ट रोजी नामनिर्देशन अर्जाची माघार घेता येईल आणि याच दिवशी सायंकाळी ६ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ४ सप्टेंबर रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी, निकाल जाहीर केला जाईल. निकाल घोषित झाल्यानंतर निवडून आलेले अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी यांची नावे प्रसिद्ध केले जातील. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विभाग परिषदेचे गठण करून ही माहिती विद्यापीठात सादर केली जाणार आहे. ७ ते १४ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे.
विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक ४ सप्टेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:46 PM