अवकाळीच्या पावसाचा तडाखा, सहा मेंढ्या ठार; २४ तासांत सरासरी ३२.६ मिमी पाऊस
By रवी दामोदर | Published: November 27, 2023 06:07 PM2023-11-27T18:07:08+5:302023-11-27T18:08:38+5:30
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते.
अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार रविवार, दि. २६ नोव्हेंबर व सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दोन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा जिल्ह्याला बसला आहे. गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३२.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसात रात्रभर भिजल्याने बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात सहा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अखेर पाऊस सक्रिय झाला असून, रविवारी रात्री सातही तालुक्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरला तर वेचणी राहिलेल्या शेतातला कापूस ओला झाला. शिवाय ढगाळ वातावरण व पावसामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली. भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
वातावरणातील बदलाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी आलेली आहे. अशातच रविवारी रात्री १२ ते साडेबारा वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
मृतक मेंढ्यांचा झाला पंचनामा
बाळापूर तालुक्यातील कसुरा साझामधील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात अवकाळी पावसामुळे सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच महसुल विभागाच्या तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील शालीग्राम तुकाराम बिचकुले यांनी स्वत:च्या मालकीच्या मेंढ्या खरबी शिवारात बसविल्या होत्या. रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच मेंढ्या व एक पिल्लू अशा सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बिचकुले यांनी पशुंचा विमा काढलेला नसल्याने त्यांच्यावर संकट ओढावले आहे.