तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. शहरात सोसाट्याच्या वाऱ्याने झाड उन्मळून पडल्याने नयाप्रेस, बसस्थानक व लोहारी रोड बंद झाला होता. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोराचा वारा सुटला. वादळ, विजेचा कडकडाट व जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या, तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी जमा केलेले गुरांचे कुटार भिजले. काही ठिकाणी कांदा साठवलेला असल्याने पावसाचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
----------------------------
पणज, बोचरा परिसरात अवकाळीचा फटका; केळीचे पीक जमीनदोस्त
पणज : अकोट तालुक्यातील पणजसह बोचरा, शहापूर, वाघोडा, गौरखेड, नरसिंगपूर भागात रविवार, दि. १६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अवकाळीचा सार्वाधिक फटका केळी पिकाला बसला असून, वादळ वाऱ्यामुळे केळीचे पीक जमीनदोस्त झाले. परिसरात केळी, कांदा, लिंबू, भुईमूग, पान पिंपरी, टरबूज, संत्रा, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुसाट वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले होते.
अचानक आलेल्या पावसामुळे कांदा व केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित झाला होता. परिसरात कृषी विभाग व शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पणजसह बोचरा परीसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
-------------
अवकाळी पावसाच्या तडाख्याने केळी, भुईमूग, कांदा, पान पिंपरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून भरपाई देण्यात यावी.
-अनिल रामकृष्ण रोकडे, केळी उत्पादक शेतकरी, पणज.
---------------------