अकोला: सोशल मीडियाचा वापर वाढत असताना, वाचनसंस्कृतीवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचं लक्षात येतं. सोशल मीडिया हे स्वत:चं मत मांडण्याचं एक माध्यम झालं आहे. तो चांगला की वाईट, हा आपआपला दृष्टिकोन आहे. त्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हायला हवा. सोशल मीडिया ज्ञानपूर्ण माहितीचं चांगलं दालन आहे; परंतु त्यावर कितपत विश्वास ठेवावा, याचाही विचार करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया मनोरंजनाचे साधन बनले आहे. त्याचा ज्ञान संपादन करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात सोमवारी दुपारी ३.३0 वाजता ह्यसोशल मीडिया वाचनसंस्कृतीला पोषक?ह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी तथा लेखक शरद पाटील होते. विचारपीठावर विदर्भ साहित्य संघाचे कोषाध्यक्ष डॉ. गजानन नारे, लेखिका प्रतिमा इंगोले, पत्रकार सचिन काटे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहूरवाघ, जिल्हा ग्रंथपाल सोपान सातभाई उपस्थित होते. परिसंवादामध्ये सोशल मीडिया वाचनसंस्कृतीस पोषक आहे की नाही, यावर चर्चा करण्यात आली. डॉ. गजानन नारे म्हणाले, सोशल मीडिया या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळते; परंतु त्यावर कितपत विश्वास ठेवावा, याचाही विचार केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगला, तेवढेच दुरुपयोगही आहेत. ज्ञानाचं साधन मनोरंजनाचं साधन बनलं आहे. घरातील संवाद हरवत चाललाय. सोशल मीडियाचा चांगला-वाईट कसा वापर करून घ्यायचा, हे आपल्या हातात आहे, असे सांगत डॉ. नारे यांनी सोशल मीडियामुळे वाचनसंस्कृती धोक्यात आल्याचे म्हणता येणार नाही, असे मत व्यक्त केले. पत्रकार सचिन काटे म्हणाले, वाचनसंस्कृती कमी झाल्याबाबतच अद्यापपर्यंत एकमत झालेलं नाही. सोशल मीडियाबाबत विश्वासार्हता कितपत आहे, याचा विचार केला पाहिजे. आज देशातील ३0 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. सोशल मीडियाचे फायदे आहेत आणि दुष्परिणामही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सोशल मीडियाचा वापर तुमचा दृष्टिकोन, कृती आणि प्रवृत्तीवर अवलंबून!
By admin | Published: February 16, 2016 1:39 AM