अकोला : कोरोनावरील लस ही गर्भवतींसह स्तनदा मातांसाठीही सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे गर्भवतींसह स्तनदा मातांनाच्या लसीकरणासही देशात परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातही लवकरच गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असून, त्याअनुषंगाने ३० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे. लस घेण्यापूर्वी गर्भवतींसह स्तनदा मातांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही तज्ज्ञांकडून केले जात आहे. जगभरात कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांमुळे कोविडचा धोका वाढत आहे. त्यापासून बचावात्मक उपाययोजना म्हणून कोविड प्रतिबंधक लस प्रभावी ठरत आहे. इतर सर्वच घटकांच्या लसीकरणाला मागील काही दिवसांपासून वेग येत असताना गर्भवती आणि स्तनदा मातांनाही लस सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता गर्भवतींनाही कोविड प्रतिबंधक लस घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सद्य:स्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका घेता गर्भवतींना ही लस सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. गर्भवतींची लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ३० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जिल्हा स्त्री रुग्णालयात विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे.
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी
गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांसाठी कोविडची लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. गरोदरांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गर्भवतींनीही घेणे गरजेचे आहे. तसेच लस घेतल्यानंतर ताप आल्यास पॅरासिटामोल घेण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, कुठलेही औषध घेण्यापूर्वी गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयातून मोहीम सुरू होण्याची शक्यता
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गर्भवतींच्या लसीकरण मोहिमेस जिल्हा स्त्री रुग्णालयातून सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गर्भवती नियमित तपासण्यांसाठी येत असतात. त्यामुळे येथेच गर्भवतींसह स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.