वैशाख पौर्णिमेला आगळे-वेगळे मांद्य चंद्रग्रहण; असा दिसेल चंद्र
By Atul.jaiswal | Published: May 2, 2023 11:42 AM2023-05-02T11:42:03+5:302023-05-02T11:43:22+5:30
आपल्या भागात याचा आरंभ रात्री ८:४४ पासुन होईल. मध्यरात्री ०१:०१वाजता ग्रहण संपेल.
अकोला: सूर्य, पृथ्वी व चंद्र यांचा निसर्गातील सावल्यांचा खेळ म्हणजेच चंद्र व सूर्यग्रहण. येत्या शुक्रवारी (५ मे) अर्थात वैशाख पौर्णिमेच्या रात्री आगळ्या-वेगळ्या उपच्छायांकित चंद्रगहणाचा अनुभव घेता येणार आहे. वैशाख पौर्णिमेला घडून येणारे हे या वर्षातील पहिले ग्रहण असुन या चंद्र ग्रहणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहणाचे वेळी चंद्र केवळ पृथ्वीच्या विरळ छायेतून जात असल्याने चंद्र किंचित धुसर वा मलीन झालेला बघता येईल. त्यामुळे पृथ्वीवर पडणारा चंद्रप्रकाश मंदप्रभ राहील.
आपल्या भागात याचा आरंभ रात्री ८:४४ पासुन होईल. मध्यरात्री ०१:०१वाजता ग्रहण संपेल. सुमारे सव्वा चार तास चालणाऱ्या सावल्यांच्या खेळाला संपूर्ण भारतभर पाहता येईल.तसेच आपल्या शेजारी देशातून सु़द्धा या मांद्य चंद्र ग्रहणाला बघता येईल.अशाच प्रकाराचे दुसरे उपच्छायांकित चंद्रग्रहण पाहण्यासाठी मात्र २९ सप्टेंबर २०४२पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. असे हे आगळे वेगळे चंद्र ग्रहण आपण अवश्य अनुभवावे असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.