शेतक-यांनी नाफेड केंद्रावर लावल्या वाहनांच्या रांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:43 AM2017-11-15T01:43:04+5:302017-11-15T23:22:05+5:30
शेतकर्यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व नाफेडने गत काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. ३ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत सात हजार ६00 शेतकर्यांनी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यात उडीद व सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक शेतकर्यांनी नोंदणी केली आहे.
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकर्यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व नाफेडने गत काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. तूर खरेदीच्यावेळी नाफेडच्या केंद्रावर गोंधळ उडाला होता. तो पुन्हा होऊ नये, या दृष्टिकोनातून शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत सात हजार ६00 शेतकर्यांनी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यात उडीद व सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक शेतकर्यांनी नोंदणी केली आहे.
खरीप हंगामामध्ये सरासरी गुणवत्ता असलेल्या शेतमालाला शासनाने आधारभूत दर जाहीर केले आहेत. मूग, उडीद शेतमालाच्या खरेदीसाठी ३ ऑक्टोबरपासून शेतकर्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. शेतकर्यांच्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतर शेतकर्यांना शेतमाल कृषी उत्पन्न बाजारात समितीतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एक तारीख दिली जात आहे. या तारखेवर शेतकर्याने नाफेडच्या केंद्रावर आपला शेतमाल आणावा. नाफेड केंद्रावर हा शेतमाल आधारभूत दराने खरेदी करण्यात येत आहे. दररोज नाफेडच्या केंद्रावर १00 ते १२५ शेतकर्यांच्या शेतमालाची सरासरी गुणवत्ता तपासून खरेदी करण्यात येत आहे. नाफेडच्या केंद्रांवर शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागत असूून, शांततेत खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी दररोज उडीद, मूग, सोयाबीन आणि तूर विक्रीसाठी आणत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्याद्वारे शेतमालाला आधारभूत भाव मिळत नसल्याने, शेतकर्यांचा कल नाफेडच्या केंद्राकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेड केंद्राने दिलेल्या तारखेवर शेतमाल आणण्यास प्राधान्य देत आहेत. शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आलेल्या शेतकर्याच्या मोबाइलवर संदेश देण्यात येऊन शेतमाल केंद्रावर आणण्यासाठी तारीख देण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शेतकर्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, सात-बारा उतारा, खरिपाच्या संपूर्ण पिकांचा पीकपेरा व त्यामध्ये काय-काय पेरणी केली आहे, याची माहिती मागितली जात आहे.
बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत सोयाबीनची आवक होत असून, आतापर्यंत ४ हजार २१५ क्विंटलची आवक झाली आहे. त्यापाठोपाठ तुरीची ५९५ क्विंटल, मूग ३९0 क्विंटल, उडीद ४९६ क्विंटलची आवक झाली असून, शेतकर्यांचा शेतमाल विक्रीसाठी सर्वाधिक ओढा हा नाफेडच्या खरेदी केंद्रावरच असल्याचे दिसून येत आहे.