आता थेट दारापर्यंत पोहोचणार पशुवैद्यक, तीन तालुक्यात फिरते पशुचिकित्सा पथक
By रवी दामोदर | Published: January 1, 2024 04:42 PM2024-01-01T16:42:27+5:302024-01-01T16:43:28+5:30
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अकोला : आता दवाखाना दूर जरी असला, तरी पशुपालकांची चिंता मिटली आहे. मुख्यमंत्री पशू स्वास्थ योजनेंतर्गत ‘फिरते पशुचिकित्सा पथक’ जिल्ह्यातील तीन तालुक्यांत कार्यान्वित होणार असून, त्यानुसार आता पशू वैद्यकीय अधिकारी थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट व अकोला तालुक्यात हे पथक कार्यान्वित होणार आहे. फिरते पशू वैद्यकीय पथक अत्याधुनिक सेवेसह सज्ज असून, त्यामध्ये पशू संवर्धन विभागाचे तीन कर्मचारी असणार आहेत. हे फिरते पशू वैद्यकीय पथक जीपीएस ॲक्टिव्हेटेड आहे. त्यासाठी पशुपालकांना संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पशूंचे पालन करणे न परवडणारे झाल्याने पशुधन झपाट्याने घटत चालले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २ लाख ८३ हजार ६८ इतके पशुधन असून, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाकडे आहे. पशुधनाची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. पशू वैद्यकीय रुग्णालयाची संख्या कमी, त्यात दळणवळणाच्या सेवा अपुऱ्या यामुळे पशुरुग्णांना पशुवैद्यकीय सेवा तत्काळ मिळावी, या हेतून फिरते पशुचिकित्सा पथक काम करणार आहे.
१९६२ क्रमांकावर करा कॉल
ज्याप्रमाणे पशू वैद्यकीय दवाखान्यामार्फत पशू वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात, त्याचप्रमाणे फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सेवा पुरविल्या जाणार आहेत. पशू वैद्यकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पशुपालकांनी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून अडचण नोंदवावी लागणार आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथक जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट व अकोला तालुक्यात कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला तीन वाहने मिळाली असून, पशुपालकांना सेवा त्वरित मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. जगदीश बुकतरे, उपायुक्त पशू संवर्धन, अकोला.