अकोला : शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे येथील पोलीस मुख्यालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर बुधवारी विजय झाला. मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आम्ही हे आंदोलन आता मागे घेत असल्याचे यशवंत सिन्हा यांनी सायंकाळी बातमीदारांशी बोलताना जाहीर केले.येथील पोलीस मुख्यालयात गत तीन दिवसांपासून शेतकरी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत आहेत. या तीन दिवसांदरम्यान विविध पक्षांचा आंदोलनास पाठिंबा मिळाला. या दबावापुढे झुकत सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या केल्या. आता कोणत्याही शेतक-यांनी आत्महत्या करू नये. हा शेतक-यांच्या धैर्याचा विजय आहे. शेतक-यांचा विजय आहे. आम्ही केलेल्या मागण्या सर्व राज्यातील शेतक-यांच्या हिताच्या असल्यामुळे सर्वांचाच फायदा होईल, असे सिन्हा म्हणाले. आंदोलन मागे घेत असल्यामुळे सर्व शेतक-यांनी आता घरी जावे, असे सिन्हा यांनी जाहीर केले. मागण्या मान्य केल्या असल्या, तरी सरकारने अंमलबजावणीत कसूर केली तर पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही सिन्हा यांनी दिला.
नाफेडच्या जाचक अटी रद्द करण्यासह सर्व मागण्या मान्य
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रवीकांत तुपकर, शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केलेल्या चर्चेदरम्यान कपाशीवरील बोंडअळीचे सर्वेक्षण, पंचनामे करून तातडीने शेतकºयांना आर्थिक मदत देऊ, मूग, उडीद, सोयाबीन शेतमाल विक्रीबाबतच्या जाचक अटी, एकराच्या मर्यादेची अट रद्द करून, शेतकºयांचा संपूर्ण शेतमाल नाफेड खरेदी करेल, भावांतराची मागणी शासनाने मान्य करून नियमाप्रमाणे शेतमालास हमी भाव देण्यात येईल, जिल्ह्यातील ६२ हजार ७४९ या ग्रीन लिस्टपैकी ५५ हजार ४१४ लाभार्थ्यांच्या खात्यात दोनशे एकोणचाळीस कोटी, सव्वीस लाख रुपये रक्कम कर्जमाफी म्हणून जमा केली असून, उर्वरित शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्पष्ट करीत, कृषी पंपाची वीज जोडणी न तोडण्याबाबत आदेश देण्यात येतील, तसेच सोने तारण कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील ३७ हजार ४९ शेतकरी बाद झाले आहेत. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणविस यांनी स्पष्ट केले.