विदर्भ कोकण ग्रामीण बँक घोटाळा; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:34 AM2020-06-06T10:34:27+5:302020-06-06T10:34:40+5:30
आरोपीस ५ जून रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ४ जून रोजी रात्री तिघांविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. या आरोपीस ५ जून रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विदर्भ कोकण ग्रामीण बँक चान्नी शाखेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी पीक कर्जाच्या रकमेची उचल न केलेल्या शेतकºयांच्या बँक खात्याचा गैरवापर करत त्यांच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. तसेच शासनाला कोट्यवधी रुपयांनी चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी ३१ मे रोजी पत्रकार परिषदेत उघड केला होता.
आमदार नितीन देशमुख यांनी बँकेकडे २८ एप्रिल २०२० रोजी तक्रार केली होती. तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील आर्थिक घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून, सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी केल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. या प्रकरणातील दोन आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
तत्कालीन अधिकाºयाविरुद्ध गुन्हा दाखल
शाखा प्रबंधक संतोष कापडिया यांनी ३० रोजी चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सेवानिवृत्त शाखा अधिकारी कैलास बद्रीलाल अग्रवाल, तत्कालीन सहायक प्रबंधक कृष्णकांत मधुकर बोरकर, तसेच तत्कालीन सहायक प्रबंधक शैलेंद्र सुरेंद्र खोबरागडे यांच्याविरुद्ध ४ जून रोजीच्या रात्री भादंविच्या ४२०, ४०९, ४६५, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच कृष्णकांत मधुकर बोरकर याला छोटा बाजार येथून अटक केली.