राजेश शेगोकार
अकोला : महायुतीची घोषणा करताना मित्र पक्षांना सोबत ठेवणार अशी ग्वाही देण्यात आली होती तिची पुर्तता भाजपाने केली असली तरी मित्रपक्षांच्या महत्वाकांक्षेचे पंख कापलेले दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये १२ जागांवर दावा करणाऱ्या शिवसंग्रामला चार जागांचे आश्वासन मिळाले असले तरी प्रत्यक्षात दोनच जागा देण्यात दिल्याची माहिती आहे.गेल्या निवडणुकीत शिवसंग्रामला तीन जागा मिळाल्या होत्या हे विशेष .
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले व बाळापूरात ऐनवेळी शिवसंग्राम ऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. दूसरीकडे मेटे यांना मंत्रीपदाचे गाजर दाखवित पूर्ण चार वर्ष झुलवित ठेवले व नंतर शिवस्मारकाची जबाबदारी देत बोळवण केली. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामने १२ जागांवर दावा केला होता त्यामध्ये पश्चिम वºहाडातील बाळापूर व रिसोड या दोन्ही मतदारसंघाचा समोवश होता. या दोन्ही जागांवर शिवसेनेने उमेदवार घोषित केले असल्याने शिवसंग्रामची अडचण वाढली आहे. यावेळी मात्र वर्साेवा व किनवट अशा दोन जागा शिवसंग्रामला देण्यात आल्याची माहिती आहे.
मैत्रीपूर्ण लढतीची चाचपणीभाजपा-शिवसेना महायुतीमध्ये शिवसंग्रामचे दायित्व भाजपाकडे आहे. शिवसंग्रामला विदर्भात हव्या असलेल्या दोन्ही व खुद्द विनायक मेटे इच्छुक असलेल्या बीड या जागा शिवसेनेच्या वाटयाला गेल्या आहेत त्यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढत देण्याची चाचपणी शिवसंग्रामच्या गोटातुन केली जात असलयाची माहिती सूत्रांनी दिली.