ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - आरोपींना न्यायालयीन समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाच्या कानशिलात एका ग्रामस्थाने लगावली. ही घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मारहाण करणाºयाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार काही आरोपींचा न्यायालयीन समन्स घेऊन शिपाई सर्वेश कांबे हा काँस्टेबल आठवले यांच्यासह तुरखेड या गावात सोमवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान समन्स घेऊन धडकले. गावात दाखल होताच समोर दिसलेल्या गजानन काळे नावाच्या मध्यमवयीन गृहस्थास त्यांनी आपल्या जवळचा कागद दाखवून संबंधित इसमांचा पता विचारला, काळे याने या समन्स मधील काही आरोपी तुरखेड या गावात राहत असल्याचे प्रत्युत्तर देऊन निघाले असता ‘त्यांचे घर जरा आम्हाला दाखवा ना’, अशी लगेच विचारणा करणाºया सर्वेश कांबे या शिपायाला काळे याने अश्लील शिवीगाळ करून धमकी देत त्याच्या कानशिलात लगावली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने गोंधळून गेलेल्या शिपायाने तडक पोलीस ठाणे गाठले. झाला प्रकार ठाणेदार वाघू खिल्लारे यांच्या निदर्शनास आणला. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन पडघन यांनीही ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनास्थळाला भेट देऊन भराडे यांनी तपास व कार्यवाहीबाबत ठाणेदारांना आवश्यक सूचना दिल्या. गजानन जानराव काळे (५०) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सर्वेश कांबे यांच्या फिर्यादीनुसार अश्लील शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंविच्या अनुक्रमे २९४, ५०६ व ३५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एसडीपीओ कल्पना भराडे व ठाणेदार वाघू खिल्लारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रतापसिंग सोळंके तपास करीत आहेत.