अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील कौलखेड जहागीर या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर खडका फाट्यावरील हातपंपापर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनल्याची स्थिती आहे.अकोला जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त ३४ गावांमध्ये प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात खारपाणपट्ट्यातील कौलखेड जहागीर या गावाला खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने, गावातील नळांना महिना-दोन महिने पाणी येत नाही. त्यामुळे तहान भागविण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खडका फाट्यावरील हातपंपावरून पाणी भरण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. १ हजार ९८३ लोकसंख्या असलेल्या पाणीटंचाईग्रस्त कौलखेड गावाला प्रशासनामार्फत गत दीड महिन्यापासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने ग्रामस्थांना हातपंप आणि टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे वास्तव आहे.