वाडेगाव परिसरात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेत चकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:05+5:302021-04-24T04:18:05+5:30

वाडेगाव: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका राज्याच्या तिजोरीबरेबरच शेतकरी कर्जमाफी योजनेलाही बसला आहे. राज्य सरकारने ...

In Wadegaon area, go to farmers' bank for crop loan! | वाडेगाव परिसरात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेत चकरा!

वाडेगाव परिसरात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेत चकरा!

Next

वाडेगाव: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका राज्याच्या तिजोरीबरेबरच

शेतकरी कर्जमाफी योजनेलाही बसला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, परिसरातील शेकडो शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या बॅंकेत चकरा वाढल्या आहेत.

परिसरात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शेतकरी पैशांची जुळवाजुळ‌व करीत असल्याचे चित्र आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच सध्या खरीप २०२१ - २२ या हंगामासाठी विविध सहकारी सोसायटीअंतर्गत कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बॅंकेत चकरा माराव्या लागत आहेत. यामध्ये अनेक शेतकरी कर्ज माफीपासून वंचित असून, त्यांना पुन्हा कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. विविध सहकारी सोसायट्यांचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून पीक कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. गत वर्षीच्या हंगामात पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना यंदा हंगामासाठी पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी वैतागले आहेत. परिसरातील काही शेतकऱ्यांना कर्ज माफीही मिळाली नाही, तर काही नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले. पैशांची अडचण असल्याने शेतकरी बॅंकेत चकरा मारत आहेत.

-----------------------------

२०० शेतकऱ्यांना मिळाले कर्ज

खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह पीक कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीक कर्ज वाटपाच्या संदर्भात विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विलास मानकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आतापर्यंत जवळपास २०० शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाल्याचे सांगितले.

--------------------------------------

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांना बी - बियाण्याचे नियोजन करण्यासाठी तत्काळ पीक कर्ज वाटप सुरू करावे.

- मनोहर सोनटक्के

शेतकरी.

Web Title: In Wadegaon area, go to farmers' bank for crop loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.