प्रतीक्षा संपली, अकोला-अकोट रेल्वेला हिरवी झेंडी; मंत्रालयाची मंजुरी
By Atul.jaiswal | Published: November 19, 2022 05:52 PM2022-11-19T17:52:11+5:302022-11-19T17:52:32+5:30
रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी : तारीख लवकरच जाहीर होणार
अकोला : अकोटकरांना गत अनेक वर्षांपासून असलेली रेल्वेची प्रतीक्षा संपली असून, अकोला ते अकोट या ब्रॉडगेज मार्गावरून रेल्वे सुरु करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अकोला-अकोट-अकाेला अशा दररोज दोन गाड्या धावणार असून, या गाड्या कधी सुरु कराव्यात याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे उप व्यवस्थापक (कोचिंग) विवेक कुमार सिन्हा यांनी १८ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
अकोला ते अकोट हा पूर्वाश्रमीचा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत होऊन सर्व सोपस्कार पार पडून दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही या मार्गावरून रेल्वे धावू शकली नाही. अकोला ते अकोट रस्ते मार्गावरील वाहतुक गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरील गत महिन्यात पुल क्षतीग्रस्त झाल्यमुळे ठप्प झाली आहे. पर्यायी मार्ग वेळ व पैसा दोन्ही खर्च करणारा असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची दखल घेत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. यानंतर वैष्णव यांनी अकोला ते अकोट रेल्वे सेवा सुरू करण्याचा आदेश दिला. त्यामुळे हालचालींना वेग येऊन डीआरएम उपविंदर सिंग यांनी १३ नोव्हेंबर रोजी अकोटपर्यंत विंडो इन्स्पेक्शन केले होते. बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी पुन्हा ते विशेष निरीक्षण गाडीद्वारे रेल्वे मार्ग व स्थानकांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल दक्षीण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालयास दिला. तिकडून हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्यनंतर रेल्वे बोर्डाने १८ नोव्हेंबर रोजी अकोला ते अकोट रेल्वे सेवा सुरु करण्यास हिरवी झेंडी दिली.
अशी धावणार रेल्वे
अकोला ते अकोट दरम्यान रेल्वेच्या दररोज दिवसातून दोन फेऱ्या होणार आहेत. पहिली गाडी अकोला येथून सकाळी सहा वाजता रवाना होऊन अकोट येथे सकाळी ७.२० वाजता पोहोचणार आहे. हीच गाडी अकोट येथून सकाळी ८ वाजता रवाना होऊन अकोला येथे सकाळी ९.२० वाजता पोहोचणार आहे. दुसरी गाडी अकोला येथून सायंकाळी सहा वाजता रवाना होऊन अकोट येथे रात्री ७.२० वाजता पोहोचणार आहे. हीच गाडी अकोट येथून रात्री ८ वाजता रवाना होऊन अकोला येथे रात्री ९.२० वाजता पोहोचणार आहे.
तीन ठिकाणी थांबे
अकोला ते अकोट धावणऱ्याा गाड्यांना तीन स्थानकांवर थांबा असणार आहे. उगवा, गांधीस्मारक व पाटसुल या स्थानकांवर या गाड्या थांबतील असे आदेशात म्हटले आहे.