अकोला: पिण्याचे पाणी, गुरांना चारा अन् रोहयोंतर्गत मजुरीची कामे यांना तत्काळ प्राधान्य द्या, याबाबत कोणतेही तक्रार येता कामा नये, अशा प्रकारे नियोजन करण्याच्या सूचना देत जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘वॉररूम’ची स्थापना करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज सकाळी ठरावीक वेळेस विविध विभागांशी संपर्क साधून आढावा घेत उपाययोजनांची पडताळणी करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृतहात बुधवारी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपवनसंरक्षक सुधीर वळवी, सामाजिक वनीकरण विभागाचे विजय माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.तहसील स्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी तसेच ग्रामसेवकांनीही आपल्या भागातील दुष्काळी गावांना भेटी देऊन दररोज आढावा घ्यावा व गावातील पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच रोजगार हमी योजनेच्या कामाच्या मागणीबाबत वरिष्ठ अधिकाºयांना तत्काळ माहिती देण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. प्रशासनाने सादर केली उपाययोजनांची आकडेवारी!जिल्ह्यात पाणीटंचाई कार्यक्रमांतर्गत विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पाणी पुरवठा नळ योजना, टँकर, विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण व गाळ काढण यासारख्या ५६९ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी ३३४ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २४० योजना पूर्ण झाल्या आहेत व उर्वरित ९४ योजना प्रगतिपथावर आहेत. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या १३७ कोटी रुपयांच्या दुष्काळ निधीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात टंचाईग्रस्त असलेल्या गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. गावातून टँकरची मागणी आल्यावर तत्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात किमान चार कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व स्तरावरून उपलब्ध होणारा चारा ३० जून २०१९ पर्यंत पुरणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली. अकोल्याला पुरेल जुलैपर्यंत पाणी!अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया महान धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध असून, जुलै अखेरपर्यंत धरणाच्या जिवंत साठ्यातून पाणी पुरवठा होऊ शकतो, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अंकुर देसाई यांनी दिली.