खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी निविष्ठांचा काळाबाजार होऊ नये, यादृष्टीने लक्ष ठेवण्याकरिता कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात १२ एप्रिलपर्यंत जिल्हास्तर आणि तालुकास्तरीय भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारींची तपासणीदेखील या भरारी पथकांकडून केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
नियंत्रण कक्षही स्थापन !
कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याकरिता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयांमध्ये आणि तालुकास्तरांवर तालुका कृषी अधिकारी व पंचायत समित्यांच्या कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी कृषी निविष्ठांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तक्रारींची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. यासोबतच जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.