अकोला : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या ‘राज्य पाणी व स्वच्छता मिशन’ च्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने, बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत अंतिम विजेत्याला पुरस्कार स्वरूपात ५० हजार रोख देण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनसाठी नागरिकांच्या संकल्पनेतील बोधचिन्ह तयार होणार आहे, हे विशेष.राज्याच्या ४ सप्टेंबर २०२० च्या मार्गदर्शन सुचनेनुसार, राज्यात पाणी व स्वच्छताविषयक सुविधांची उपलब्धता करण्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्य स्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्थापन करण्यात आले आहे. राज्य स्तरावर मिशनकरिता ब्रिदवाक्य असलेल्या बोधचिन्हाची आवश्यकता असून, भविष्यात ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छताविषयक सुविधांची उपलब्धता करताना या बोधचिन्हाचा उपयोग राज्यभर केल्या जाणार आहे. त्याकरिता बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका ३० सप्टेंबर २०२० या कालावधीपर्यंत राज्यास पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राज्याच्यावतीने देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करून बोधचिन्ह तयार करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.असे असावे बोधचिन्हग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाचा सहज बोध होईल, असा बोधचिन्ह (लोगो) असावा. या बोधचिन्हाचे (लोगो) ब्रिदवाक्य मराठीमध्ये आणि मोजक्या शब्दातून असावे. बोधचिन्ह (लोगो) एकरंगी, बहूरंगी प्रकारात असला तरी चालेल. सहभागींनी राज्य स्तरावर लोगोची सॉफ्ट कॉपी विभागाच्या directorwsso@gmail.com व iecwsso@gmail.com या मेल आय डीवर पाठविणे आवश्यक असेल. सोबत संपर्क क्रमांक, पत्ता असणे आवश्यक आहे. अंतिम निवड होणाऱ्या स्पर्धकांनी सीडीआर(उऊफ) फाइल उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. लोगो अंतिम करण्याचे अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला असतील.सहभागी स्पर्धकांनी आपापल्या प्रवेशिका ३0 सप्टेंबर २० ला दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातून राज्य स्तरावर प्राप्त होतील, याची खबरदारी घ्यावी, आदी सूचना स्पर्धेकरिता राज्य स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येने राज्यस्तरीय बोधचिन्ह स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे.- सौरभ कटारिया,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला.