अकोला : अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या सोडवून शेकडो उद्योगांना संजीवनी देण्यासाठी कूपनलिकांना परवानगी दिली जाणार आहे. आधी भूजल सर्वेक्षण, जिल्हाधिकारी कार्यालयातील ना हरकत प्रमाणपत्र आणा आणि परवानगी घ्या, असा फतवाच अकोला एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्यावतीने निघाला आहे. आतापर्यंत अकोल्यातील दोन उद्योजकांनी कूपनलिकेसाठी परवानगी मागितली आहे, इतरांचे अर्ज अजून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पावसाने यंदा पाठ फिरविल्याने अकोलेकरांवर ऐन हिवाळ््यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. पुरेसे पाणी नसल्याने अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या अधिक तीव्र झाली असून, शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अकोला एमआयडीसीतील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अमरावती येथे बैठक झाली. त्यात कायमस्वरूपी पाणी समस्या सोडविण्यावर मंथन झाले. त्यानंतर मजीप्रा विभागाने १७ कोटींच्या पाणी पुरवठा पाइपलाइन प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. दरम्यान, कुंभारी तलावाचा ताबा घेण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे.एमआयडीसीतील उद्योगांना पाणी पुरविण्यासाठी अकोला एमआयडीसीच्यावतीने कुंभारी तलावातून तीन दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. दोन तास पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे उद्योजकांची सारखी ओरड असते. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने कूपनलिका करण्याची परवानगी देण्याचे ठरविले आहे. ज्या उद्योजकांना कूपनलिका करावयाची असेल त्यांनी भूजल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणावेत, त्यांना परवानगी दिली जाईल, अशी माहिती अकोला एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड यांनी दिली. जानेवारीपर्यंत कुंभारी तलावाचा पाणी पुरवठा चालेल, असेही ते बोललेत. मात्र, जर उन्हाची तीव्रता वाढली तर बाष्पीभवनातून पाणी कमी होऊ शकते. जानेवारीनंतर मात्र स्थिती वाईट होणार असल्याचे ते बोललेत.